Sunday, September 9, 2012
समानार्थी शब्दांचं विरुद्धार्थी व्याकरण...!
समानार्थी शब्दांचं विरुद्धार्थी व्याकरण...!
माझा एक जुना मित्र आहे आठवण काढून त्याला कधीही दूरध्वनी केला कि त्याचं ठरलेला उत्तर '"मी नंतर 'कॉल' करतो".अगदी आत्ता आत्तापर्यंत मी त्याच्या शब्दावर विश्वास ठेवून त्याचा 'कॉल' येईल म्हणून वाट बघत राहायचो.पण पट्ठ्या कधीच 'कॉल' करत नाहीं. बँकेत काम करताना कधी नव्हे ते एखाद्या ग्राहकाला गुंतवणुकीकरता एखादी योजना सांगितली कि त्याचा येणारा उत्तर, "साहेब नक्की करतो पण पुढच्या महिन्यात..! " या उत्तरावर महिने सोडाच पण वर्ष झाला तरी तो ठाम आहे. संस्थेकडून लादले जाणारे आणि बँकिंग चा पूर्वानुभव नसलेले व्यवस्थापक म्हणजे तर अजब नमुनेच आहेत. वरिष्ठांचा कुठलाही 'ई' मेल , मेसेज आला कि हे लगेच बाह्य सरसावून तोच 'तुमच्या माहितीकरता' असं म्हणून सगळ्यांना पाठवणार.पण हे करताना वरिष्ठांनी हे सर्व इतर लोकांपर्यंत त्याच माध्यमातून आधीच पोहोचवलेला आहे हे यांच्या गावीही नसतं. एकदा का हाताखालच्या लोकांना 'संदेश' पाठवला कि हे 'जबाबदारी' ढकलायला मोकळे !काही वेळा तर जी गोष्ट त्यांना आणि फक्त त्याचं करायला सांगितली आहे त्याचे संदेश हि हे इतरांना पाठवतात, मग ज्याला तो 'संदेश' आलाय त्याने तो नीट वाचायचा आणि पुन्हा पाठवणार्याला सांगायचा कि 'साहेब' हे तुमच्यासाठीच आहे !. सुरवातीला मी अगदी असे 'संदेश' मनापासून वाचायचो, आता मी फसत नाहीं.
असाच एक व्यवस्थापक, आम्हा सगळ्यांची 'मिटिंग' घ्यायचा. 'संघटना, जबाबदारी.ग्राहक सेवा, संघ, एकत्रित जबाबदारी' इ.इ शब्द तो वापरायचा.प्रत्यक्षात त्याच्या विरुद्ध वर्तन असायचा त्याचं, काहीही चांगला झाला कि ते 'त्याने' केला आणि जे जे वाईट होईल ते इतरांमुळे (मुख्य रोष माझ्यावर असायचा.!) शेवटी एकदा स्पष्ट सांगितला सगळ्यांसमोर, "नाहीतरी तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी काही करताच नाहीं नं, तर मग मी या पुढेही काही करणार नाहीं, मला विचारू नका..!! नंतर मी सोडून इतरांची 'मिटिंग' व्हायची..ग्राहक येवून तिष्ठत उभे राहायचे.. एकाने मला विचारला "हि काय वेळ आहे का मिटिंग घ्यायची ? तुम्ही आत (केबिन मध्ये ) नाहीं गेलात 'मिटिंग' ला? म्हटला "हो. काय आहे नं मला उगाच 'हो' ला 'हो' म्हणायला आवडत नाहीं, खटकला तर मी बोलतो. 'ते ' ज्यांना जमतं ते सगळे आत आहेत.. आणि 'वेळेचं' जे आहे नं ते त्यांना जाऊन सांगा..मी माझं काम करतोय !"
मला हे असं 'बोलायचं एक आणि करायचं एक' हे धोरण खपत नाहीं, होत असेल तर 'हो' म्हणा, नसेल तर स्पष्ट 'नाहीं' सांगा, उगाच गोड गोड बोलत 'बघूया' कशाला म्हणायचं ? शाळेत असताना आमच्या 'जोशी' सरांचं एक ठरलेला वाक्य होतं-"सगळं बरोब्बर आहे !" वाक्य सरळ असला तरी त्याचा रोख असा असायचा कि ऐकणार्याच्या थोड्या उशिरा लक्षात यायचा कि 'तुझं चुकलेला आहे' असं सरांना म्हणायचं आहे !! शाळेतल्या रम्य दिवसांमध्ये ते एकच वाक्य सकारात्मक असूनही नकारात्मक आहे हे कळलं होतं.तोच प्रकार परीक्षेचा - समानार्थी शब्द द्या, विरुद्धार्थी शब्द द्या असे प्रश्न परीक्षेत होते. शाळा सोडली आणि तिथून पुढे हे वरकरणी समानार्थी दिसणाऱ्या शब्दांचं विरुद्धार्थी व्याकरण समोर यायला लागलं .राजकीय भाषेत बोलायचं झाला तर याला खास 'काँग्रेसी' व्याकरण म्हणता येईल."आमचा पक्ष भ्रष्टाचारच समर्थन करत नाहीं" हे पृथ्वी बाबांचं दोन दिवसापुर्वीच वाक्य (दर्डांच्या संदर्भातला) हे वानगी दाखल पुरेसा आहे. पक्ष समर्थन करत नाहीं पण भ्रष्टाचार करणार्यांना संधी देतो, पद देतो, फायदा घेतो त्याचं काय ? (उदा.कलमाडी !), असो..(आली मिळी गुप चिळी- सगळेच कोळसे आहेत..!)
असं मधाळ पण खोटं बोलून आपण नक्की काय मिळवतो? जरी तत्क्षणी आपल्याला होणार्या त्रासाची धार कमी होते हे मान्य केला तरीही, समोरच्याला केव्हा नं केव्हा कळतच नं कि गोड बोलणारा खोटं बोलतोय किंवा आपल्याला टाळतोय ते ! मग असं आडून बोलण्यापेक्षा थेट खरं बोलायचं धाडस का नाहीं करायचं ? निदान गैरसमज तरी होणार नाहीं नं.त्याने. पण यालाच म्हणे 'व्यावसायिकता' म्हणतात. असाच मला मिळालेला एक सल्ला -'वैयक्तिक भावं भावना कार्यालयात आणू नकोस'! कामावर परिणाम होतो. क्षणभर मान्य केला पण नंतर विचार आला, प्रामाणिकपणा, चांगले संस्कार, विचार, आणि संवेदना बाहेर ठेवून जर का मी बँकेची पायरी चढायला लागलो तर माझा 'स्व' त्व काय उरतं?, यांच्याकडे अनुकरण करण्यासारखा काय आहे? तर, 'बँकेच्या' ग्राहकाला वाट्टेल ते खोटं बोलून 'विमा' विका,पैसे मिळेपर्यंत ग्राहकाच्या मागे मागे फिरा, आणि एकदा का त्याचा 'अर्ज आणि पैसा ' मिळाला कि त्याला 'विसरा' ! त्याला त्याची गरज आहे का? त्याची कुवत आहे का? इ. मुद्यांचा विचारही करायचा नाहीं.अशाच 'लुटलेल्या' पैशामध्ये नंतर 'सर्वोत्तम लुटारू' शोधून त्यांना 'कंपनी' देश विदेशात फिरायला घेवून जाणार. ओल्या,सामिष पार्ट्या झोडणार. हा यांचा व्यवसाय आणि हि यांची व्यावसायिकता.यातल्या एकाही गोष्टीचा मला मोह नाहीं.आणि ते माझं ध्येय हि नाहीं, त्या मूळे अशा 'फालतू' व्यावसायिकतेचा 'पायिक' होण्या पासून मी चार हात लांब आहे. यांचे छुपे मनसुबे आणि कामाची पद्धत बघून राग येतो. नावाला 'बँक' उघडायची आणि 'तिथे' आपल्याच दुसर्या विमा कंपनीच्या योजना विकायच्या.का तर म्हणे त्या शिवाय 'बँक' फायद्यात चालू शकत नाहीं ! कसं शक्य आहे, हे? अरे शुद्ध दुधात नफा असताना तुम्ही पाणी मिश्रित दुध विकून सुद्धा नफा नाहीं म्हणता, हे कसं पटेल? आणि हे भेसळयुक्त दुध पिवून येणारी ताकद किती दिवस पुरेल?
असाच एक जुना प्रसंग,आत्याच्या नव्या घराची वास्तुशांत होती, पुण्यात. आत्त्याने मला आणि माझ्याच वयाच्या एका मुलाला (सधन कुटुंबातील) काही पैसे देवून खरेदीला पाठवलं. खरेदी होऊन आम्ही दोघे घरी आलो, सगळा व्यवहार आणि पैसे हे दोन्ही त्या मुलानेच बघितलं. मी नुसता बरोबर होतो. पण नंतर आत्याने 'मोठ्या आवाजात सर्वांसमक्ष मला विचारला, "अरे दिलेले पैसे कुठे आहेत? किती झाले? किती बाकी राहिले? ते दे बरं. असं सांगितला " मग मी पैसे ज्याच्या हातात दिले गेले होते त्याचा नाव सांगितला.पण काय आश्चर्य त्याला तिने 'चकार' शब्दाने विचारलं नाहीं. "मग ठीक आहे " येवढा मोघम उत्तर मिळालं. ती थेट काहीच म्हणाली नाहीं, पण आमची परिस्थिती गरिबीची असल्यामुळे, 'मी' पैसे 'ढापलेत' का याची ती चाचपणी होती. कारण प्रश्न हिशोबाचाच असता तर तोच प्रश्न त्याला हि विचारला गेला असता, आणि उरलेले पैसेही मागितले गेले असते.पण तसं झाला नाहीं. कारण तिला जे सुचवायचा होतं ते 'वेगळंच' होतं आणि ते मी 'व्यवस्थित' समजून घेतलं. आज माझ्या सुदैवाने माझ्या शाखेची तिजोरी माझ्याच हातात आहे..आणि दैवयोगाने जो विश्वास 'त्या' आत्त्याने दाखवला नाहीं नेमका तोच विश्वास बँकेचे ग्राहक माझ्यावर दाखवतात, त्यांचे पैसे विश्वासाने माझ्याकडे द्यायला त्रयस्थ माणसालाहि सांगतात. त्यांची कागद पत्र, पैसे काहीही असलं तरी बँकेतली इतर लोक सोडून माझ्याकडेच आणून देतात. नं बोलावता !अशा प्रत्येक वेळी लहानपणीचा तो प्रसंग हटकून आठवतोच.
त्याचं आत्त्याचा दुसरा किस्सा. बाबा गेल्यावर दहाव्या दिवशी, पिंडाला कावळा शिवत नसताना..तिने मला काय सांगावं? "आत्याचे सर्व पैसे मी परत देईन म्हण"...ज्या आत्त्या करता शेवटचे दोन महिने बाबा अखंड राबत होते, तिला बाबांच्या जाण्या पेक्षा तिच्या अडकलेल्या पैशाचा दुक्खं जास्त होतं, पण बोलताना वाक्य काय तर "तुझ्या बाबांचा जीव त्यात अडकला असेल नं..म्हणून तसं म्हण...!" काय तरी 'आव'....!!! 'ती'ने जे केला ते ती वयाने मोठी म्हणून मी निमूट ऐकून घायचा..आणि मी तिचा उद्देश सांगितला- खरं बोललो तर 'उद्धट' !
सगळे पैसेदेताना पुन्हा विचारला, 'तुझे आणि काही असतील, व्याज असेल तरी सांग...देतो !!! पैसे बुडवणं हा उद्देश माझ्या बाबांचाही नव्हताच ! देण्याची वेळ पाठी -पुढे झाली असेल.
काय म्हणायचं ते म्हणा.मी माझ्या संवेदना पूर्ण जागृत ठेवून प्रामाणिक पणे काम करत आलोय..आणि तसंच करणार.समोरच्याला फसवायचे संस्कार माझ्या 'आई -बाबांनी' माझ्यावर केलेले नाहीत.माझ्या शब्दाचा जो खरा अर्थ आहे तोच समोरच्या पर्यंत गेला पाहिजे. शेवटी 'शब्दाची' म्हणून काही किंमत आहे का नाहीं ?
तूर्तास इतकंच.
गुरुप्रसाद खाडिलकर.
सदाशिव पेठ, पुणे.
०९-०९-२०१२.
सायंकाळी. ४.५८ वा.
९९६०३९७७७३
९४०४८३७३७३
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment