ती असताना ती नसताना....
फरक तसा पडतंच नाही....
आपण तसे एकटेच असतो नेहमी,
हे फक्त वेळेत कळत नाही,
ती नसताना, मजा होती,
तंद्रीत माझ्याच हरवून
जगण्यात नशा होती,
मित्र , गप्पा, खाणं आणि झोप,
सगळ्यांची ओढ अखंड होती !
सगळे एकतर आपलेच,
किंवा थेट परके.
एवढीच विभागणी होती,
अचानक तिची ओळख झाली,
मैत्रीच्या थांब्यावर,
प्रेमाचा भ्रम झाला,
माझा मलाच....
ती तशीच स्थिर होती,
मित्र, घरचे, बाहेरचे,
एवढे सगळे सोडून..
तीच फक्त जवळची होती....!
तसा तिने मला अंतरावरच ठेवलं,
पण मीच आपली वेड्यासारखी ,
"नंतर सांगेल ती"...
म्हणत लढाई चालू ठेवली ,
मनाची, वेळाची, आणि पैशांची
रसद खर्ची घालूनही,
नियंत्रण रेषा ओलंडता येत नाही,
हे फार उशिरा लक्षात आलं...
ती तशीच होती.. प्राप्त परिस्थिती !
स्वप्नं, जाणिवा- उणीवा,
या सर्व माझ्याच मी लादून घेतलेल्या,
ती आधीपासूनच...तशी होती...
विश्वासाचा गळा घोटून ,
एका ना सांगता येणाऱ्या प्रश्नचिन्हाचा,
विचार करत,
मी अधांतरी झाल्यावरही,
आपल्यातच रममाण,
ती तशीच आहे...
मी मात्र 'शेवरीच्या' कापसा सारखा,
अधांतरी, माझ्याच शोधात,,,
.ती नसताना ती असताना
फरक तसा पडतंच नाही,,,
आपला असणंच, महत्वाच,
तेच नेमका कुणाच्या नजरेत नाही,
बाकी ती असताना- नसताना,
फरक तसा पडतंच नाही..!
- गुरुप्रसाद हरी खाडिलकर.
९५६१४३४९८८
नंदुरबार,
19-1-2011
संध्याकाळी- ७.५५
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment