उर्जा-
'स्व'त :च्या अस्तित्वाची जाणीव करून आपल्या अंगभूत क्षमतेवर आधी स्वताला आणि मग जगाला विश्वास ठेवायला संप्रेरित करणारी गोष्ट म्हणजे उर्जा. या उर्जेच अस्तित्व प्रत्येकाला जाणवत असत. या उर्जेचा स्त्रोत मात्र व्यक्तीनुरूप भिन्न असतो. तो दृश्य,अदृश्य,तात्कालिक, काल्पनिक,वास्तविक असा काहीही असू शकतो. या स्त्रोता पर्यंत घेवून जाणारी मनोवस्था हि व्यक्तीसापेक्ष आहे. 'आहे ते सगळं उत्तम आहे'किंवा 'आहे ते सगळा उत्तम होईल' असं मानून वाटचाल करणारी माणसं ज्यांना आपण आशावादी म्हणतो त्यांच्या दृष्टीने अपेक्षित भविष्यकालीन बदल हे त्यांचं उर्जास्थान असतं. त्यांना अपेक्षित बदल भविष्यात होईल हा विश्वास त्यांच्या मनामध्ये निर्माण करणारी हर एक गोष्ट हि अशा उर्जेचा स्वाभाविक 'उगम्स्त्रोत' असते. या उलट आपण ज्यांना 'निराशावादी' माणसं म्हणून नाकं मुरडतो त्यांच्या लेखी 'अपेक्षित आणि आवश्यक असणारा स्थायी स्वरूपाचा बदल होणं सद्यस्थितीत जेव्हा पूर्ण पणे अशक्य आहे' या गोष्टीची जाणीव करून देणारा हर एक प्रसंग अथवा घटना हि त्यांना जगाप्रती / जीवनाप्रती असणारी 'हतबलता'/ 'विवशता'/'अगतिकता' अधोरेखित करत असते. व अशा 'निराशेचे' / दुक्खाचे मुळ (नकारात्मक उर्जेचा स्त्रोत ! ) त्यांचा दृष्टीकोन 'नकारात्मक' करत असते. अशा माणसाचे अंतिम ध्येय पक्के असेल आणि त्याप्रती त्याचा निश्चय दृढ असेल तर 'निराशावादी माणूसही उत्तुंग भरारी मारू शकतो ! नकारत्मक बाजूंची एकदा का 'कल्पना' आली कि त्याचं भय वाटत नाही ! ज्या क्षणी भय संपतं तीथुन पुढे 'निराशावादी' माणसाचा आत्मशोध सुरु होतो. या शोधामध्ये 'टोकाची निराशा' हीच अद्भुत उर्जा म्हणून काम करते !
'आशा आणि निराशा मिळून जीवन घडत असते. निव्वळ आशावादी राहून आयुष्य जगता येइलच असं नाही ! निराशेची जाणीव तीव्रतेने होणं हे हि अत्यंत आवश्यक आहे, कारण निराश होणारा माणूस आधी केव्हा न केव्हा आशावादी असतोच, ज्याक्षणी त्याचा 'कल्पित' आशावादावरून कडेलोट होतो त्या क्षणी तो निराशेच्या गर्तेत जातो. कोसळणाऱ्या माणसालाच 'गुरुत्विय बलाची आणि आकाश ठेंगण करणाऱ्या उंचीची महती कळते ! एखाद्या गोष्टीकडे बघताना निव्वळ नफा / तोटा
या पलीकडे जाऊन त्यामुळे होणारे परिणाम, त्यामागचा हेतू, स्थूल आणि सूक्ष्म कारणे, ईश्वरी नियमन यांचाही विचार व्हायला हवा ! चूक आणि बरोबर हि पट्टी तोकडी अहे. आजचं बरोबर उद्या चूक वाटू शकतं आणि आजच चूक उद्या बरोबर सिद्ध होऊ शकतं ते सर्वस्वी 'काळाच्या' हातात आहे !
एखादा प्रश्न आणि त्याला दिलं जाणारं उत्तर हे प्रश्न विचारणाऱ्या माणसाबरोबर बदलत जात ! प्रत्येक उत्तराचं समर्थन करणारे असंख्य युक्तिवाद आपलंच मन आपल्याबरोबर करत असतं त्या त्या क्षणी आपणही 'हेच' बरोबर म्हणून आपली पाठ थोपटत असतो ! विविध भारती वर केव्हातरी लागलेलं आणि चुकून ऐकलेला गाणं आपलं मन प्रसन्न करतं, गाणं आवडला म्हणून ते भ्रमणध्वनी मध्ये साठवून बरोबर ठेवला आणि हव त्या वेळी ऐकला तर 'पहिला' आनंद काही केल्या होत नाही ! खर तर गाणं ऐकणं शब्दश: आपल्या हातात असताना असं होतं. 'गाण्याचे बोल, चाल, आवाज आणि संगीत जरी तेच असेल तरीही आपल्या मनाची अवस्था बदलत असते, त्यामुळे असं होता. 'गाणं' मी हवा तेव्हा ऐकू शकतो हा फाजील विश्वास त्या गाण्याचा आनंद घालवून टाकतो, 'आशेच हि तसच आहे !' अनपेक्षित घटनांमध्ये खूप जास्त ताकद असते. अशा घटना माणसाला आणि त्याच्या विश्वासाला मुळापासून हादरवून टाकतात. 'पर्याय' आला कि नकळत 'तुलना' होते. माणूस त्यातल्यात्यात 'सुरक्षित' वाट निवडतो. आणि पर्यायाच नसेल तर वाटेत येईल त्या दगड गोट्याला, खड्याला तुडवत माणूस आपली पायवाट तयार करतो. अशावेळी,'दुसरा पर्याय उरलाच नाहीये या निराशेची जाणीवच त्याला पुढे मार्गक्रमण करायला प्रवृत्त करते."नेमका काय चाललाय हे कळत नाही " असा ज्यावेळी आपण म्हणतो त्याच वेळी आपण अंतर्मुख होऊन विचार करतो… मग हळू हळू बर्याच गोष्टी कळायला लागतात !
उर्जा हि प्रत्येक गोष्टीत असते, पण तिचं अस्तित्व सर्वाना जाणवेलच असं नाही. तो भाग अनुभुतिचा ! कधी "खूप खाल्लं पण भूक भागलीच नाही / चटकन भूक लागली" असं वाटत, तर कधी "दिवसभर इतकं काम होतं कि भूक लागलेली कळलीच नहि" असा म्हणतो विज्ञानाचे निकष लावले तर इतकि 'उर्जा'शरीराला मिळाली' आणि 'इतकी खर्च झाली' असं गणित मांडाव लागेल। 'कॅलरिचा' हिशोब जुळला तरी 'समाधान' मिळेलच असा नहि, आणि मनाला समाधान मिळून येणारी प्रस्संनता हि आपोआप व्यक्त होणारी बाब आहे त्या साठी 'वैज्ञानिक' ठोकताळे नकोत.रोज सकाळी एकाच साबण अंगाला लावून अंघोळ केली तरी रोज वाटणारा तजेला निरनिराळा असतो. लहानपणी 'सकाळच्या' शाळेत जाण्यासाठी म्हणून बाबांनी जबर्दस्तीने घातलेली 'अंघोळ' त्यावेळी नकोशी वाटली तरी आज 'आठवल्यावर' परत असा कुणीतरी कडेवर उचलून घेवुन, थेट 'हर् गंगे SSSS भागीरथी SSSSS !!!! " म्हणत अंगावर पाणी ओतावं असं वाटतं !
त्या वयात अंगावरून निथळून गेलेलं पाणी आजही मनाला हर्षभरित करतं !
उर्जा हि प्रत्येकाच्या आजूबाजूला आणि प्रत्येकात दडलेली आहेच तिचा शोध लागणं आणि सत्कार्याकरता उपयोग होणं महत्वाचं. उर्जा हि कधीही एकटी येत नाही,ती तिची इतर रूपे (गती,स्थिती) सोबत घेवून येते, या उर्जेला उर्ध्व /अधो गती देणं हे काम संस्कारांचं आणि अंगभूत वृत्तीचं ! योग्य काय अयोग्य काय हि तार्किकता कालानुरूप विकसित होत जाते. 'बालपण' संपलं आणि 'मी' पणाची जाणीव झाली कि, 'आत्मकेंद्री' विचार सुरु होतो. हि स्वाभाविक क्रिया अहे. 'मी' जसा आहे 'तसाच' लोकांना दिसणं आणि त्यांनी स्वीकारणं हे झालं स्वीकृत बालपण. 'मला जसं हवं तसा माझं आयुष्य मी घडवू शकतो, लोकांना मी माझी दाखल घ्यायला लावीन . हे आहे स्वाभाविक 'तारुण्य', 'लोकांना' मी जसा अभिप्रेत आहे तसा होण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक करणं हा 'गृहस्थाश्रम, आणि "मी' हे काही करू शकेन असा अजिबात वाटला नव्हतं पण झालं !असा वाटत असतानाच 'मी' अमुक तमुक होऊ शकलो असतो पण झालो नाही किंवा होऊ शकलो नाही याची बोच लागणं हे झालं हतबल वार्धक्य !!!
'नाळ' वेगळी झाल्यावर फोडलेल्या पहिल्या 'टाहो' पासून घेतलेल्या अंतिम श्वासापर्यंत चा प्रवास ज्या विश्वासावर प्रत्येक माणूस करतो 'तो' विश्वास म्हणजेच जीवनाच्या जाणिवेची खरी उर्जा .
गुरुप्रसाद हरी खाडिलकर.
२८-०२-२०१३
रांजणगाव
मध्यरात्री २. ० वा !!!
No comments:
Post a Comment