पुण्याच्या आय एफ बी आय मध्ये प्रवेशा पासून सुरु झालेला प्रवास (कि फरफट
?), उद्या संपणार ! पुण्यातून सुरु झालेला एक वर्तुळ उद्या पुण्यापासून
पन्नास किलोमीटर वर पूर्ण होणार . नंदुरबार , शिरूर आणि मग रांजणगाव अशी
त्रिस्थळी यात्रा आटपून नवा प्रवास 'सुसाट' सुरु होणार ! दापोली सोडताना
डोक्यात बर्याच कल्पनांचं वावटळ घोंघावत होत. कुठल्यातरी क्षणी त्या
वादळाची दिशा अकल्पित पणे 'केरळ' च्या दिशेने वळली . वादळ घोंघावत शांत
झाल, त्या वेळी माझं अस्तित्व 'पालापाचोल्याहून' वेगळा उरला नव्हत ! 'पुढे
काय ?' हा प्रश्न माझं बोट सोडायलाच तयार नव्हता. अशा वेळी नाईलाज म्हणून
आलेली एक संधी स्विकारली… उत्तर मिळाल्याचा आनंद व्हायच्या आत 'चालू असलेला
प्रशिक्षण' सोडून मी रस्त्यावर (अक्षरश:) आलो ! 'माझ्या कामापेक्षा माझ्या
पोशाखाला महत्व देवून त्याचाच 'बभ्रा' करणाऱ्या लोकांबरोबर मला काम करायचा
नाही या एकाच विचाराने मी तिथून निघालो . (१ मला त्यांनी काढला नव्हतं,
२. माझा पोशाख गबाळा / अस्वच्छ नव्हता . ३ अपेक्षित पोशाखा संबंधी
कोणतीही सूचना मला तिथे पोचण्या आधी केली गेली नव्हती .).
माझ्या 'भारतीय' पोशाखाला 'नावं' ठेवणार्यांच्या हातातल्या 'विदेशी'
बनावटीच्या 'सिगरेटी त्यांना चालत होत्या पण माझा पोशाख चालला नाही .
हा प्रकार मला पटला नाही. मी बाहेर पडलो .
'शेकड्यांनी' (होय !!) दिलेल्या बँक आणि इतर आस्थापनांच्या प्रवेश
प्रक्रिया मी माझ्या 'सुमार दर्जाच्या ' गणितामुळे 'पास' होऊ शकलो नाही .
दुसरा मार्ग दिसत नसताना वर्तमान पत्रात आलेल्या 'एका चार महिन्यात नोकरी
मिळवा ' या जाहिरातीला बळी पडलो आणि आय एफ बी आय पुणे इथे दाखल झालो .
कोर्स चालू व्हायलाच दोन महिने गेले. पुढचे आठ महिने 'कोर्स' चालूच होता … !
नातेवाईक, मित्र, आणि घर कुहेही जाणं जीवावर यायचं. 'मग कधी नोकरी ??' या
प्रश्नाच उत्तरच नसायचं ! दुश्काळात तेरावा महिना म्हणजे 'हातात पडलेल्या
'नेमणूक पत्रावरच नेमकं माझचं नाव चुकीचा छापलेला असल्यामुळे आणि एक
महिना वाया गेला .
शेवटी एकदा नेमणूक पत्र मिळालं ! मुंबई, रत्नागिरी
,सुरत आणि पुणे असा अपेक्षित ठिकाणांचा क्रम दिलेला असताना … माझी रवानगी
थेट 'नंदुरबार' मुक्कामी केली होती ! पहिल्याच दिवशी बँकेत गेलो, काहीही
काम न करता निव्वळ बाकड्यावर बसून सर्वांची ओळख परेड होऊन जेव्हा
रात्री खोली वर परत आलो तेव्हा इतका दमायला झाल होतं कि बस्स ! गाढ झोपलो .
तीन चार दिवसांनी बँकेपासून तीन चार किलोमीटर लांब अंतरावर खोली भाड्याने
घेतली .
पहिल्या दोन दिवसातच मी झोपेत असताना चोर खोलीत फिरून माझे खिसे साफ
करून, खिशातले देवाचे फोटो आणि इतर कपडे , पिशव्या बाहेर फेकून गेले हे
सकाळी कळलं ! पहिल्या मजल्यावर 'लागतील तशा आणि लागतील तेवढ्या' बादल्या
भरून न्यायच्या ! सकाळी आठ सव्वा आठ ला बाहेर पडायचा आणि रात्री नऊ दहा
वाजेपर्यंत परत यायचा ! रविवारी धोबीघाट काढायचा ! 'कागदावर बहुल आणि
प्रत्यक्षात मारवाडी बहुल अस्सालेल्या या भागात सकाळी भजी, फाफडा, तिखट
पोहे इ आणि एरवीच्या जेवणात कांदा आणि मिरची यांची सवय व्हायला लागली
तो पर्यंत नंदुरबार सोडायची वेळ आली . सुरभी ची खिचडी, घी बाजारातल्या
गणपती देवाला जवळची 'कच्छी दाबेली' , तिथलाच 'दही वडा' यांची आजही आठवण
येते.
नंदुरबार पासून काऊनटर क्रमांक एक आणि मी एकरूप झालो !
ती शाखा अशी नव्हतीच मुळी ! एक साधी चिंचोळी पट्टी होती ज्यामध्ये एका
रेषेत टेबल आणि खुर्च्या मांडून तिची 'बँक' केलेली होती ! एसी नव्हताच…
पंखे होते पण कागदपत्रे उडतील म्हणून तेही बंदच ठेवावे लागायचे ! 'घामाघूम '
व्हायला व्हायचं ! विवेक, जितु, तुषार, आणि विजू यांच्या करामती आणि
कसरती मुळे मजा यायची .दिवसातून दोन वेळा चालत 'क्लिअररिंग हाउस ' ला जावं
लागायचं… बाजारातली माणसांची गर्दी , गाढवं , गुरं , बकऱ्या,
हातगाड्या,गाड्या आणि 'भाजून ' काढणार ऊन , या सगळ्यातून ख्न्द्याला
लावलेली पिशवी
घेवून सुसाट धावत सुटायचं - रोज तेही दोन वेळा- बारा वाजून पंधरा
मिनिटांनी आणि तीन वाजून पंधरा मिनिटांनी ! दुपारच्या फेरीत 'गाणी ऐकणा,
एखादि डुलकी काढणं, आणि नंतर 'टी टी ' करून एखाद्यावेळी वाटे तल्याच
वाचनालयातून पुस्तक बदलून आणणे इ कामे करावी लागत !
नंदुरबार ला वैतागलो होतो आणि आता इथून सुटका होणारच
नाही असं लक्षात आल तितक्यात 'निव्वळ' नशिबाने ध्यानी मनी नसताना 'शिरूर'
ला बदली मिळाली .
शिरूर ला आलो याचा आनंद फार काळ टिकला नाही.
तिथल्या शाखेतल्या माणसांची (प्रमुख), वागण्याबोलण्याची पद्धत आणि 'विमा'
विकण्याची केली जाणारी सक्ती या गोष्टी मला न पटणार्या होत्या ! तिथल्या
प्रमुखाच्या या मुजोरीचा 'बंदोबस्त' करण्याचा एक छोटा प्रयत्न मी तिथल्या
फक्त दीड महिन्याच्या कालखंडात केला . 'ग्राहकाला' दुरुत्तरे करणारा हा
प्रमुख 'माझ्या' 'खेळी' ने नामोहरम झाला ! त्याला त्याच ग्राहकाच्या मागे
माघार घेत फिरावं लागलं. मी शांतपणे सगळं पाहत होतो !
निव्वळ एक दिवसाकरता म्हणून मला 'रांजणगाव' ला पाठवला
गेलं ! कोणताही पूर्वानुभव नसताना पहिल्याच दिवशी एकशे दहा '
क्याश एन्ट्री' केल्या !
दुसर्या दिवशी परत निघालो
. वाटेत असतानाच उप व्यवस्थापकांनी बोलावून घेतलं ! "तुझं काम आवडलं तू
इथेच थांब आजपासून … वरिष्ठांशी बोलणं झालाय ! " त्या दिवसापासून
उद्या पर्यंत या शाखेत आहे ! सह कर्मचारयांबरोबर यथेच्छ भांडण, मस्करी ,
मजा अनुभवली . सर्व प्रकारच्या ग्राहकांशी, त्यांच्या माणसांशी बोलण्यात ,
भेटण्यात एक प्रकारचा आपलेपणा आहे . हा आपलेपणा आणि आदर असे पर्यंत इथून
बाजूला होण्यात मजा आहे . हा एक भाग आणि दुसरा म्हणजे वाढत चाललेली
अंतर्गत अरेरावी आणि मुस्कटदाबी . ज्यांनी कधी बँकेत काम केला नाही अशा
माणसाच्या हातात हे जर का शाखेची सूत्रे देवू लागले तर अशा माणसाला वरिष्ठ
मानून काम करणं हे हाताखालच्या लोकांसाठी अवघड होत. अशा व्यक्तींच्या
अज्ञानाचा आणि त्यांच्या अंदाधुंद मनमानीचा मी मिळेल तेव्हा अधिकृत विरोध
नोंदवला . माझ्या कृतीला एकदा यश मिळालं . शाखा व्यवस्थापक बदलला. नको
तिथे नियमावर बोट ठेवून पदाच्या जोरावर डरकाळ्या फोडणाऱ्या लोकांना
'त्यांची' जागा दाखवून देण्यात मी हयगय केली नाही . माझा स्पष्ट विरोध, आणि
योग्य आक्रमण ज्यांना पटला त्या माणसांनी मला मदतही केली . सुदैवाने मला
दुसरी संधी मिळाली .
'राजीनामा' दिल्यानंतर मला अनेकांचे खरे चेहरे कळले .
राजीनामा दिल्यावर झालेल्या भेटीत 'यांनी' आज पर्यंत जाणीव
पूर्वक दुर्लक्षित केलेले 'गुण' कळले . त्या कौतुका पाठोपाठ 'कशाला जातोस ?
जाऊ नकोस !! अशी विनवणी … आणि या विनंतीला मी पूर्ण सौजन्याने
'नकार' दिल्यावर सुरु झालेला 'सुडाच' राजकारण ! हे सगळा पचवणं अवघड गेलं !
नऊ ते सहाच्या पलीकडे जाऊन समोरच्या माणसाला त्याच स्वतः च आयुष्य आहे,
'मत आहे' हा विचार हि समजून न घेणाऱ्या या माणसाना 'वरिष्ठ' कसा म्हणायच
? ''तोंडाने' व्यावसायिकतेच्या गप्पा मारायच्या आणि स्वतः असं
सूडबुद्धीने वागायच!
'मला लेखी ताकीद देण्याचा केविलवाणा प्रयत्न त्यांनी केला … मी
पुन्हा 'हल्ला ' केला ! त्यांच्या वर्मावर आणि कुकर्मावर बोट ठेवला ! बास …
माझ काम झाल … माझा मार्ग मोकळा झाला !
'केरळ ' मध्ये मी पाला पाचोळा होऊन जमिनीशी एकरूप झालो होतो म्हणून मी हि हिम्मत करू शकलो .
एकीकडे वरिष्ठांचा हा अनुभव येत असताना … ग्राहकांनी आणि सहकारयानी उदंड प्रेम दिला . 'साहेब कशाला जाता ? या कि इकडच … !
इथपासून ' सेटिंग लावून देवू का ? इकडचा पोष्टिंग देतो तुम्हाला … इथपर्यंत प्रतिक्रिया आल्या . !!
गाडीवरून पडल्यावर तर सहकाररयानी आणि ग्राहकांनी (सुहृदांनी ) केलेल्या मदतीला तर तोडच नाही !
योगायोग असा कि पहिल्या ठिकाणी मी ज्या पोशाखात 'रस्त्यावर' आलो तसाच पोशाख घालून मी इथला 'राजीनामा ' दिला !!
आणि एक वर्तुळ पूर्ण झाला .
यावेळी माझ्याकडे संधी आहे आणि माझी स्वताची गाडीही आहे .
श्री महागणपती कृपा !
गुरुप्रसाद हरी खाडिलकर.
रांजणगाव.
२ ९ / ० ६ / २ ० १ ३ .
संध्याकाळी ६. ० १वा .
No comments:
Post a Comment