चौकट
चाकोरीचे बन्ध नको, मुक्तसंचार हवा,
परवशता नको, देवा तुझा आधार हवा,
निर्गुणाची ओढ अंतरीची,
सगुण साकार व्हावी,
तुझ्या कृपेची अनुभूती,
देवा आता त्वरित यावी !
अंतरीची खळबळ, विचारांचा वादळ,
परिस्थितीत विरून जाण्या आधी,
माझं मी पण मला परत दे,
'"मला मंजूर नाही,
ते मी करणार नाही",
हे सांगण्याचा बळ परत दे....!
खाली मुंडी करून वर्षानु वर्ष जगण्यापेक्षा,
ताठ मानेने सामोरा जाता येईल असा मरण दे !
आता खरतर काहीच सिद्ध वगैरे करायची इच्छा नाही,
पिसेपनाच्या पासोडीने आत्ममग्न अवस्थेत
तुझा शोध घेत जगण्याचा वरदान मात्र त्वरित दे..
तपस्वी नसलो तरी मनस्वी आहे मी,
म्हणून तर मागतोय तुझ्याकडे...
वेडेपणा असेलही आलम दुनियेकारिता...
पण अशी वेडं आणि वेड्यांना तुझी कवाडं
नक्की उघडी असतील ..पूर्वीप्रमाणेच ...या नंतरही !
पहिला पाऊल उचलण्यासाठी,
तुझ्या कुशीत येण्यासाठी आतुर झालेल्या मला,
लवकरात लवकर आदेश दे....
मी तयार आहे.....त्या 'दीव्या' करता...
पण 'गुरु' हि , चौकट तेवढी नकोय..
साद देतोय...प्रतिसाद मिळेल या आशेने !!!
-गुरुप्रसाद हरी खाडिलकर.
२९/१२/२०१०
नंदुरबार.७.५८ संध्याकाळी
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment